इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका 24 वर्षाच्या तरुणीवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना वाघोली येथे घडली होती. आरोपी स्वप्निल तुजारे याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली होती. आरोपीने वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी आरोपीला ३० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
आरोपी स्वप्निल तुजारे आणि फिर्यादी यांच्यात नातेसंबंधातून मैत्री झाली, त्याचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर आरोपी तरुणीला भेटण्यासाठी आला. त्यावेळी आपल्याला लग्नाची बोलणी करायची आहे, असं सांगून एका लॉजवर घेऊन गेला. लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्याने तरुणीवर बळजबरीने बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने आरोपीला २१ एप्रिलला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, आरोपीच्या वतीने वकील राधिका भिसे आणि शामराव कांबळे यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर युक्तिवाद करताना आरोपीच्या वकीलांनी या गुन्ह्यातील आरोपी व फिर्यादीचे शारीरिक सबंध हे प्रेमातून तसेच संगणमताने झाले आहेत.
लग्नाचे आमिष हे ज्या वेळी दिले त्यावेळी ते पूर्ण करण्याच्या हेतूनेच दिले होते. लग्नाची बोलणी झाल्यानंतर फिर्यादीने बोलणे बंद केल्याने आरोपी स्वप्निल आणि फिर्यादी यांच्यात वाद होता. याच वादातून फिर्यादी यांनी खोटा गुन्हा दाखल केला होता, असा युक्तिवाद वकील राधिका भिसे आणि शामराव कांबळे यांच्या वतीने करण्यात आला. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीचा जामीन मंजूर केला आहे.