Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजलंके यांच्या मागे उभे राहू; शरद पवार

लंके यांच्या मागे उभे राहू; शरद पवार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत महायुतीमध्ये गेलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके गुरुवारी (ता. १४) कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात पोहोचले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांनी पक्षाचे ‘तुतारी वाजवणारी व्यक्ती’ हे चिन्ह स्वीकारले.

“लंके यांनी मधल्या काळात वेगळी भूमिका घेतली; पण ते लोकांमध्ये काम करत होते. आवश्यकता भासल्यास आम्ही त्यांच्या मागे उभे राहू,” असे पवार म्हणाले. पवार यांचा आदेश माझ्यासाठी शिरसावंद्य आहे, असे लंके म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयामध्ये पवार, प्रदेशाध्यक्ष पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, दादा कळमकर, प्रताप ढाकणे यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अंकुश काकडे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.

पवार म्हणाले, “राजकारणात मला लोकांनी नेहमी पाठिंबा दिला. सामान्य परिस्थितीमधून वाटचाल केलेल्या लंके यांचे कार्य मी पाहिले आहे. जनतेची त्यांना साथ आहे. लंके यांनी एमआयडीसी आणली, दुग्धव्यवसाय आणला. लंके यांच्याबरोबरीने पक्षाची लोकप्रियताही वाढली.”

पाटील म्हणाले, “सर्वसामान्यांचे नेते, संकटकाळात धावून येणारा नेता अशी लंके यांची खास ओळख आहे. पवार यांची विचारधारा लंके यांनी स्वीकारली आहे. ते आता पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. लंके यांच्यासारख्या तरुणांना पवार यांच्याकडून ऊर्जा मिळते.”

लंके म्हणाले, “मी शरद पवार यांची साथ कधीही सोडली नव्हती. त्यांचा फोटो आजही माझ्या कार्यालयात आहे. निवडणुकीबाबत आमची कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. अजित पवार यांनी माझ्या आमदारकीबाबत काही विधान केले आहे हे मी ऐकलेले नाही. माझ्या उमेदवारीबाबत पक्षाचे नेते चर्चा करतील. मी कार्यकर्ता आहे. त्यावर मी काही बोलणार नाही.”

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

निवडणूक आयुक्त नेमणुकीबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाची निवड मंडळातून गच्छंती केली. त्यांना पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे मनमानी पद्धतीने त्यांनी नियुक्त्या करणे सुरू केल्या आहेत. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या या मोदींच्या इच्छेनुसार झाल्या आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका पवार यांनी केली.

वसंत मोरेंनी घेतली पवारांची भेट

मनसेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात माध्यमांसमोरच पवार यांची भेट घेतली. त्यामुळे मोरे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली. ही अनौपचारिक भेट होती. निवडणुकीसंबंधी काहीही चर्चा झाली नसल्याचे मोरे यांनी सांगितले. तर मला कोणीही भेटले म्हणून खुलासा का करत बसू, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments