इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर आता कडेकोट सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या पिशव्यांची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक तपासणी यंत्र (स्कॅनर मशिन) बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर दिवभरात २०० पेक्षा जास्त रेल्वे गाड्यांची ये-जा असते. स्थानकावर दीड लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करत असतात. रेल्वे प्रवास करताना ज्वलनशील वस्तू, स्फोटक साहित्य किंवा शस्त्रांची वाहतूक करण्यास बंदी आहे. मात्र, या सर्वांची पडताळणी करण्यासाठी स्थानकावर एकच तपासणी यंत्र होते. ते यंत्रदेखील मधल्या काळामध्ये बंद पडून होते. आता मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव जुने तपासणी यंत्र दुरुस्त करण्यात आले असून नव्याने दोन तपासणी यंत्रे बसविण्यात आली आहेत.
कसे असेल सुरक्षा नियोजन ?
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी पिशव्यांची तपासणी करण्यासाठी आधीचे एक आणि नव्याने दोन अशी तीन यंत्रे बसविण्यात आली आहेत. तसेच, रेल्वे सुरक्षा दलाचे १६ कमर्चारी, एक वरिष्ठ अधिकारी आणि सहायक अधिकारी असे १८ जणांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे.
‘प्रवाशांजवळ असणाऱ्या अवजड सामान आणि पिशव्यांची यंत्राद्वारे तपासणी केल्यानंतरच फलाटामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वे स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून प्रवाशांच्या पिशव्या तपासण्यासाठी अत्याधुनिक दोन तपासणी यंत्रे प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आली आहेत. तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना फलाटावर प्रवेश देण्यात येणार आहे’.