Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजरेड कार्पेटवरून 'सखी'ची मतदान केंद्रात एंट्री

रेड कार्पेटवरून ‘सखी’ची मतदान केंद्रात एंट्री

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे, ता. १३: प्रवेशद्वारावर साकारलेली सुबक रांगोळी, गुलाबी फुग्यांची आकर्षक सजावट त्याला साजेसा मंडप अन् रेड कार्पेट अशा दिमाखदार उत्साहपूर्ण वातावरणात महिला मतदारांनी सखी मतदान केंद्रात मतदानाचा हक्क सोमवारी बजावला. निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पोलिसांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे महिला मतदारांचा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचा आनंद द्विगुणित झाला.

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज झाले. यामधील पुणे लोकसभा मतदार संघातील सखी मतदान केंद्रांत महिलाराज असल्याचे चित्र होते. या केंद्रांचा कार्यभार महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या हाती होता. मतदानासाठी येणाऱ्या ज्येष्ठ महिलांना रांगेत ताटकळत थांबावे लागू नये यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली होती. प्रतिक्षा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. तसेच मतदारांसोबत येणाऱ्या लहान मुलांची देखरेख

करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली होती. कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर व परिचारिकांचीही नेमणूक करण्यात आली होती.

सेल्फी अन् गप्पा

मतदान केंद्राच्या बाहेर आल्यावर कोणी आईसोबत तर कोणी मैत्रीण, आजी सोबत सेल्फी घेत असल्याचे चित्र होते. तसेच आपल्या ओळखीच्या व्यक्ती मतदानाच्या निमित्ताने एकत्र भेटल्याने केंद्राच्याबाहेर १०० मीटर अंतरावर आल्यावर अनेक ठिकाणी गप्पांचे फड रंगले होते.

प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. लोकशाहीसाठी मतदान महत्त्वाचे आहे. तरुणाईने कंटाळा न करताना मतदान करावे. सखी मतदान केंद्रावरील व्यवस्था उत्तम आहे. येथील कर्मचाऱ्यांसह पोलिसांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. – अनुपमा मोकाशी, ७२ वर्षीय आजी

सखी मतदान केंद्रावर शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन असल्याने आम्हाला मतदान केंद्रात कोणतीही अडचण आली नाही. येथील सजावटीने भारावले. मी, माझी बहिण व माझ्या ८० वर्षीय आजीने येथील सखी केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments