इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाटटोलनाका परिसरात विरुध्द दिशेने भरधाव निघालेल्या रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात आज (दि.३) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा अपघात झाल्यानंतर रिक्षाचालक रिक्षा दुसऱ्याच्या घराबाहेर लावून पळून गेला आहे. अपघातग्रस्त दुचाकीचालक व रिक्षाचालक या दोघांचीही अद्याप नावे समजू शकली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दुचाकीचालक हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. तर रिक्षाचालक हा विरुद्ध दिशेने येत होता. यावेळी भरधाव रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर रिक्षाचालक हा सदर ठिकाणावरून पळून गेला.
दरम्यान, रिक्षाचालक हा पळून जाताना शाहीर महेश खूळपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिले. त्यानंतर खूळपे व त्यांच्या साथीदारांनी रिक्षाचा पाठलाग करून रिक्षा पकडली. मात्र, रिक्षाचालक हा त्या ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. सदरची रिक्षा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार उमेश ढाकणे यांनी वाहतूक पोलीस ठाण्यात जमा केली आहे. अपघाताची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु आहे.