इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर दौंडजजवळ अज्ञात वाहन व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला आहे. अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून गाडीसह पळून गेला.
अमोल विठ्ठल दगडे (वय ३८, मूळ गाव दौंडज सध्या रा. मावडी क.प, ता. पुरंदर) व दिग्विजय यशवंत कोलते (वय ३४ रा. पिसर्वे, ता. पुरंदर जि पुणे) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून अमोल दगडे व दिग्विजय कोलते हे दोघे जण दौंडजहून जेजुरीकडे येत होते, यावेळी समोरून येणारे अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अपघात स्थळी न थांबता गाडी चालक गाडीसह पळून गेला आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे अधिक तपास करीत आहेत.