इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः रायगडावरील वाघ्या श्वानाचे शिल्प हटवण्यास आमचा विरोध आहे. रायगडावरील वाघ्याचे शिल्प आम्ही हटवू देणार नाही. गरज भासल्यास आम्ही या प्रकरणी कोर्टात दाद मागणार आहे, अशी माहिती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली.
स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीचा प्रश्न उपस्थित केला होता. ही समाधी कपोलकल्पित असून, तिला इतिहासाचा कोणताही आधार नाही, असे ते म्हणाले होते. यासंबंधी नवा वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका मांडली. या वेळी इतिहासतज्ज्ञ संजय सोनवणी हेही उपस्थित होते.
लक्ष्मण हाके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला, त्यावेळी होळकरांनी मोठी मदत केली होती. त्यावेळी टिळक, फुले व होळकर यांनी वाघ्या शिल्पाविषयी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. छत्रपती संभाजीराजे यांची निवड रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी किल्ल्याचे संवर्धन करावे. पण, ते हे आपले काम सोडून किल्ल्याची नासधूस करत आहेत. यामुळे त्यांची प्राधिकरणावरून हकालपट्टी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, संभाजीराजे यांनी वाघ्या श्वानाच्या स्मारकाप्रकरणी सरकारला 31 मेचा अल्टिमेटम दिला आहे. राज्यातील सर्वच ओबीसी बांधवांचा यावर आक्षेप आहे, असेही ते म्हणाले.
वाघ्या श्वानाच्या इतिहासाचा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव
अनेक ऐतिहासिक शिल्पांत छत्रपती शिवरायांसोबत हा वाघ्या दिसत आहे. शिवाजी महाराजांसोबत हा श्वान नेहमी राहत होता. छत्रपतींच्या सैन्यात श्वानांचे देखील पथक होते. त्याचेदेखील पुरावे आहेत, म्हणून याचा उल्लेख जर्मन लोकांनीदेखील जपून ठेवला आहे. 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्या वेळी त्यांची समाधी मांडली आणि तिथं तो श्वान महाराजांच्या समाधीकडे पाहत आहे, असा उल्लेख 1845 मध्ये लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आहे. वाघ्या ऐतिहासिक नव्हता हा दावा खोटा आहे. वाघ्या श्वानांच्या इतिहासाचा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा, हे दुर्दैवी असल्याचे संजय सोनवणी यांनी सांगितले. सध्या राजकीय हेतूने बोलून इतिहासावर वाद उकरून काढला जात आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते यांना पत्र लिहिणार असून, इतिहासावर चुकीचा इतिहास बोलून तेढ निर्माण करणारी वाक्ये, व्यक्तींवर बंदी घालावी, अशी मागणी करणार आहे. तसेच न्यायालयातही याबाबत जाणार असल्याचे सोनवणी यांनी सांगितले.