इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
राज्यात पुन्हा पावसाचे आगमनझाल्यानंतर अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. आजही हवामान खात्याने राज्यातील काही भागांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पुणे तसेच कोकणात वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील २४ तासांसाठी पुण्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा तसेच विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात, घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा दिला असून, यामुळे मच्छिमारांना आणि लहान होड्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजीचे तसेच सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, आज पुण्यात जोरदार पाऊस झाला तर खडकवासाला धरणातील पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्यात येईल. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण ७० टक्के भरले आहे. अशातच कोणत्याही पुरस्थितीचा धोका टाळण्यासाठी खडकवासला धरणातील पाणी सोडण्यात येईल. अशास्थितीत नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.