इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यात तापामात वाढ जाहलेली दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. किमान व कमाल तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारीतच तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात 1-2 अंशांनी तापमान कमी होणार असून त्यानंतर पुन्हा वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होणार असून, त्यानंतर पुन्हा 1 ते 2 अंशाने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, किमान तापमानात पुढील तीन दिवसांमध्ये 2 ते 3 अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यामध्ये मोठा बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भात मात्र पुढील 72 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यात पुन्हा वाढ होणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील हवामान कसे असेल?
राज्यात अबहुतांश ठिकाणी तापमान 35 अंशांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील चंद्रपूर येथे 36.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर सोलापूर आणि वर्धा येथेही कमाल तापमान 36.9 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेले दिसून आले. पुण्यात काही ठिकाणी तापमान 37 अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते.
बुधवारी (12 फेब्रुवारी) ला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमान तुलनेने उष्ण होते. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोड्या प्रमाणात गारठा जाणवला. सर्वात कमी तापमान शाहदा (नंदुरबार) येथे 12.5 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. तर लोणी काळभोर (पुणे) येथे 12.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. कोकण किनारपट्टीवरील शहरांमध्ये किमान तापमान हे तुलनेने जास्त होते.
पहाटेच्या गारव्यात वाढ..
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये पहाटे गारठ्यात वाढ झाली होती. मात्र, दुपारी उष्णतेच्या झळा तशाच कायम होत्या. येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान साधारण राहणार असून पहाटे गारवा जाणवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.