इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. होळीनंतर अवकाळी पावसाचे ढग पाहायला मिळत आहे. एकीकडे तापमान वाढत असतानाच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून याबद्दलचा मोठा इशारा देण्यात आला आहे. आज राज्याच्या तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान आज पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमान 36.4 अंश सेल्सिअस आणि 18.2°c असणार आहे.
राज्यात इतर ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, विदर्भात पारा वाढताना दिसतोय. चंद्रपूरमध्येही तापमान वाढताना दिसतंय. यामुळेच नागरिकांनी घराच्याबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१°C आणि २२°C च्या आसपास असेल.