इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. सध्या नव्या महायुती सरकारच्या स्थापनेसंदर्भातील घडामोडी वेगात सुरु आहेत. आता राज्यात महायुतीचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील बड्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
भाजपाकडून जो निर्णय होईल, तो निर्णय शिवसेना मान्य करील अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद जाहीर केली. त्यामुळे महायुतीमधील मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेला पेच सुटल्याचं स्पष्ट झाले. महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरील आजची बैठक महत्त्वाची असणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबात अंतिम निर्णय घेताना अमित शाह हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजप या पदासाठी कुणाची निवड करणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे. तथापि, इतर नावांचीही चर्चा सुरु झाली आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात यावे म्हणून राज्यभरात भाजप नेत्यांकडून मागणी केली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी दिली. नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील, असेही ते म्हणाले.