इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील येरवडा येथील खुल्या कारागृहात असलेला जन्मठेपेचा कैदी रक्षकांची नजर चुकवून पळून गेल्याची घटना घडली आहे. राजू पंढरीनाथ दुसाने (वय-४३, रा. महालगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून प्रकरणात २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.
तेव्हापासून तो कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुल्या कारागृहात रवानगी केली होती. याबाबत कारागृह पोलीस शिपाई अविनाश गोविंद पवार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू दुसाने याला २०१५ साली वारजे माळवाडी परिसरात झालेल्या एका खून प्रकरणात अटक केली होती. या खून प्रकरणात त्याला फेब्रुवारी २०२१ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे येरवडा कारागृहातील कैद्यांची संख्या मोजणी सुरु होती.
यावेळी कैदी दुसाने हा दिसून आला नाही. त्यानंतर संपूर्ण कारागृहात त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाय करत आहेत.