इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील येरवडा येथील वस्तु व सेवा कर भवन कार्यालयातील राज्य कर निरीक्षकावर लाच मागणी आणि स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे घटकाकडून कारवाई करण्यात आली आहे. व्यापाराचा जी.एस.टी. नंबर पुर्नजिवीत करून देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तुषारकुमार दत्तात्रय माळी, (वय ३३ वर्ष, पद राज्य कर निरीक्षक, राज्यकर सह आयुक्त, नोडल विभाग २, पुणे, वर्ग-२, अराजपत्रित) असे कारवाई झालेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार (वय २७ वर्ष) यांनी याबाबत तक्रार केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचा वकिली व्यवसाय असून, ते जी.एस.टीची कामे करतात. त्यांच्या एका व्यापारी अशिलाचा जी.एस.टी. नंबर जी.एस.टी. विभागाने रद्द केला होता. तो पुर्नजिवीत करण्यासाठी यातील तक्रारदार हे त्या व्यापारी अशिलाच्या वतीने जी.एस.टी कार्यालय, येरवडा येथे गेले असता, लोकसेवक तुषारकुमार माळी, राज्य कर निरीक्षक, यांनी तक्रारदार यांच्या व्यापारी अशिलाचे काम करुन देण्यासाठी त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागणी केली होती. याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
तक्रारदार यांच्या प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर लोकसेवक तुषारकुमार माळी यांनी तक्रारदार यांच्या अशिलाचे वरील काम करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे स्वतः करीता ५ हजार रुपयांची लाच मागणी केली. तसेच लाचेची रक्कम ५ हजार रुपये आज रोजी त्यांच्या सरकारी कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोकसेवक तुषारकुमार माळी यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे घ परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहे.