इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात करोडोंचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या मनोरुग्णालयात जवळपास 900हुन अधिक रुग्ण उपचार घेतात. या रुग्णांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो, हा निधी या रुग्णावर खर्च झाला पाहिजे. परंतु अस असताना या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने केला आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांवर सव्वाकोटी रुपयांच्या अनियमिततेचा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या मनोरुग्णालयातील स्वच्छता कंत्राट, सौर व उष्ण जलसंयंत्र, किरकोळ साहित्य, व्यसनमुक्तीसाठी लागणारे साहित्य इतकेच नव्हे तर मनोरुग्णांसाठीच्या आंतरर्वस्त्र खरेदीमध्येही पैसे खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान ‘डॉ. पाटील यांनी २०१७ पासून रुग्णालयात १ कोटी २५ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असून त्यांच्यासह तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक आणि लिपिक यांच्याकडून हे पैसे वसूल करावेत असे समितीने म्हटले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.