इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः महिला बचत गटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी महिला व बालविकास विभागाने यशस्विनी ई-कॉमर्स हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी राज्यभरातून ११ हजारांपेक्षा जास्त बचत गटांनी या संकेतस्थळावर नोडणी केली आहे. महिला बचत गटात विविध उत्पादने मोठ्या मेहनतीने तयार करतात. मात्र, या उत्पादनांची विक्री कुठे आणि कशी करायची, हा प्रश्न असतो. याबरोबरच बचत गटांना त्यांच्या उत्पादनांचे विपणन (मार्केटिंग) करण्यालाही मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास खात्याने यशस्विनी ई-कॉमर्स हे ऑनलाइन संकेतस्थळ सुरू केले आहे. आता महिलांना त्यांच्या उत्पादनाची विनामूल्य जाहिरात करण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांना रास्त किमत मिळण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा मिळाला आहे.
ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील बचत गटांची नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने असून, महिला तसेच बचत गटांना यशस्विनी संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार बचत गट आपली नावनोंदणी करू शकतात. उत्पादनाचे छायाचित्र अपलोड करणे आणि किमतीसह गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी डॅशबोर्डची व्यवस्था आहे. उत्पादन पॅकिंग, वाहतूक, साठवणूक आणि हाताळणी याविषयी माहिती असणार असून, उत्पादनाची विक्री झाल्यानंतर रक्कम ऑनलाइन माध्यमातून खात्यात जमा होणार आहे. महिनाभरात राज्यभरातून ११ हजारपिक्षा जास्त बचत गटांनी नोंदणी केली आहे. दररोज त्यामध्ये वाढ होत आहे.
राज्यभरातील नोंदणी केलेल्या बचत गटांचा आढावा
नागपूर ११८०, परभणी १०५४, ठाणे १०३०, जळगाव ९०६, सांगली ७९६, गोंदिया ४९४, भहारा ४७३, बुलढाणा ४२२, चंद्रपूर ४०८, सोलापूर ३९९. नाशिक ३७६, अमरावती ३७३, वर्धा ३५७, हिंगोली ३२९, जालना २५८, वाशिम २४५, धुळे २४२, नगर १७४, अकोला १७१, कोल्हापूर १३५, सातारा १३३, छत्रपती संभाजीनगर १३०, लातूर १२४, यवतमाळ १२१, पुणे ११८, धाराशिव १०६, मुंबई उपनगर १०१, नंदूरबार ९७, बीड ८७. सिंधुदुर्ग ८६. गडचिरोली ८५, नांदेड ६२, पालघर ४२, रायगड २८. मुंबई शहर २६, रत्नागिरी २२ आणि जिल्ह्य न निवडलेले बचत गट ११ अशा एकूण ११ हजार २०१ बचत गटांनी नोंदणी केली आहे.