Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमोदींनी मारले रेसकोर्सचे मैदान

मोदींनी मारले रेसकोर्सचे मैदान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : भगव्या डोक्यावर टोप्या, फेटा, खांद्यावर भगवा झेंडा, अन् गळ्यात उपरणे यामुळे रेसकोर्सचे मैदान भगवेमय झाले होते, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत इथे भगवा महासागर उसळला आहे अशी दाद दिली.

भाषणामध्ये मराठीतून पुणेकरांचे धन्यवाद देतानाच ‘पुणे तेथे काय उणे’ अशी केलेली कोटी, राहुल गांधींचा शहजादे उल्लेख करताच कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष… अब की बार ४०० पार, मोदी… मोदी… मोदी… अशा घोषणांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याने पंतप्रधान मोदींनी सभेचे मैदान मारले.

लोकसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे भाजपतर्फे नियोजन करण्यात आले आहे. या सभेला पुणे शहरासह बारामती, शिरूर आणि मावळ या मतदारसंघातील ग्रामीण भागातून नागरिक उपस्थित होते. सभा संध्याकाळी सहाच्या सुमारास सुरु होणार असली तरी दुपारी चार वाजल्यापासून सभा स्थळी लोक जमू लागले.

पण उन्हाच्या चटक्याने व उकाड्याने कार्यकर्त्यांचे हाल झाले. रेसकोर्सच्या मैदानात सावली नसल्याने ऊन कमी होई पर्यंत परिसरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीत विसावा घेतला. संध्याकाळी पाचनंतर सभेच्या ठिकाणी तरुण ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे, महिलांचे पावले वळू लागली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, व्हीआयपी पासवर आतमध्ये जाण्याची कार्यकर्त्यांची धडपड सुरु होती, त्यामुळे तेथे ढकलाढकलीही झाली. सभेच्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती.

पावणे सातच्या सुमारास मोदी यांचे व्यासपीठावर आगमन होताच मोदी… मोदी… मोदी… मोदी.. अशा उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोदींनी नमस्कार करताच शिट्ट्या, टाळ्यांनी जल्लोष झाला. भाषणाला सुरुवात करताना मोदींनी मला इथे भगवा महासागर उसळलेला दिसत आहे असे सांगितले.

यावेळी माईक मध्ये ‘एको’ येत असल्याने आवाज घुमत होता. त्यामुळे मोदींनी भाषण थांबवत ‘एको’ बंद करा, देशातील १४० कोटी जनताच माझी ‘एको’ आहे असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मोदी यांच्या ४९ मिनिटांच्या संवादी भाषणात ‘शहजादे’चा मुद्दा उपस्थित करताच कार्यकर्त्यांनी त्यास घोषणा देऊन प्रतिसाद दिला. त्यावर मोदी यांनी, तुम्ही हेच ऐकण्यासाठी इथे आला आहात का? असे विचारत खळखळून हसत दाद दिली.

माझा जय श्रीराम सांगा

सभेला जमलेल्या नागरिकांना मी एक काम सांगणार आहे. सभा संपल्यानंतर तुम्ही घरोघरी जेव्हा प्रचाराला जाल तेव्हा प्रत्येकाला माझा ‘जय श्रीराम’ सांगा, असे आवाहन मोदींनी केले.

लहान मुलांनी वेधले लक्ष

या सभेला लहान मुले मोदी यांचे फोटो घेऊन बराच वेळ उभे होते. मोदी यांचे भाषण सुरु होण्यापूर्वीही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती, तेव्हा त्यांनी इशारा करून खाली बसण्यास सांगितले होते. तरीही ही मुले उभीच राहिल्याने भाषणाला सुरुवात करताच मोदी यांनी ‘मी तुम्हाला बघितले आहे, तुम्ही खूप वेळेपासून उभे आहात, तुम्ही खाली बसा’ असे आवाहन केले.

रिकाम्या खुर्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल

रेसकोर्सच्या अवाढव्य मैदानावर सुमारे १ लाख नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली होती. समोरच्या भागात तुडुंब गर्दी असली तरी पाठीमागे सुमारे १०-१५ हजार खुर्चा रिकाम्या होत्या. त्याचे व्हिडिओ विरोधकांनी सोशल मिडियावरून व्हायरल करून मोदींची सभा फ्लॉप झाली असा प्रचार सुरु केला.

घर मिळाल्याने दिव्यांग आजी सभेला

सोलापूर रस्त्यावरून जवळपास एक किलोमीटर आतमध्ये नागरिकांना चालत सभेच्या ठिकाणी जावे लागत होते. यामध्ये दिव्यांग असलेल्या एक आजी जनाबाई कांबळे या मार्केटयार्ड परिसरातील आल्या होत्या. मला मोदींजीमुळे घर मिळाले आहे, त्यामुळे धन्यवाद देण्यासाठी मी या सभेला आले होते असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments