इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम जलद गतीने व्हावे यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल,’ अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बुधवारी (१९ फेब्रुवारी) ला केली आहे.
अधिक माहिती अशी की, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (१९ फेब्रुवारी) झाले, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. या वेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, आमदार विजय शिवतारे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, अमृत पुरंदरे, प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिसुत्रीवर उभारण्यात आलेले हे दालन प्रेरणादायी आहे. राज्यातील आणि देशातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र ठरेल,’ पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. महाराजांनी तेंव्हाच भाषेचे महत्त्व जाणले होते. त्याकाळी अरबी, फारसी भाषेत चालणारा राज्यकारभार महाराजांनी मराठीमध्ये सुरू केला होता. आज्ञापत्रातील आणि राज्य कारभारातील अनेक शब्द त्यांनी मराठी भाषेत आणले होते. लढवय्ये महाराज संगळ्यांनाच माहीती आहेत. मात्र, त्या पलीकडे स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुरस्कार करणारे महाराज, पर्यावरणप्रेमी, युद्धकौशल्याचा अभ्यास असलेले महाराज, योग्य प्रशासक असलेले महाराज असे महाराजांचे अनेक पैलू पुढे आणण्याचे काम शिवसृष्टी करेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश कदम केले. आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजित आपटे यांनी केले, तर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी आभार मानले आहेत.