इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुण्यात काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा होत होती. मात्र आता यावर रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
कॉंग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं एक व्हॉट्स अॅप स्टेटस देखील अलिकडे चर्चेचा विषय ठरले होते. त्या स्टेटस मध्ये त्यांनी खांद्यावर भगवं उपरणं घेतल्याचा फोटो होता. यानंतर धंगेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील धंगेकरांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक वक्तव्य केलं होतं.
मी काँग्रेस मध्येच राहणारः रवींद्र धंगेकर
मात्र, आता या सगळ्या घडामोडीनंतर स्वतः रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘मी काँग्रेस मध्येच आहे व काँग्रेस मध्येच राहणार आहे. आता मी काँग्रेस पक्षकार्यामध्ये सक्रीय होणार आहे. यावेळी ते व्हॉट्सअॅप स्टेटस बद्दल बोलताना म्हणाले, ‘भगवा हा केवळ शिवसेनेचा नाही. तो सगळ्यांचाच आहे. असं म्हणत धंगेकरांनी आपण कॉंग्रेस मध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.