इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुळशी तालुक्यात न जाण्याच्या अटीवर मनोरमा यांना अटी शर्ती वर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात निर्णय झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना धमकावल्याचा आरोप होता. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यानंतर शहरातील पौड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज त्यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
प्रत्यक्ष गोळीबार झाला नसल्याने खुनाच्या प्रयत्नाचे कलम लागू होत नाही. मनोरमा यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. त्यामुळे आर्म अॅक्ट लागू होत नाही. तिने स्वरक्षणासाठी पिस्तूल वापरले, असा युक्तिवाद मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता. आज त्यावर न्यायालयाने निर्णय देऊन जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश अजित मरे यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली होती. बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा, सरकारी पक्षातर्फे अॅड. कुंडलिक चौरे, तर मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. अमेय बलकवडे यांनी बाजू मांडली.