इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांना इशारा दिला आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बऱ्याच महाविद्यालयांनी संचालक, प्राचार्य आणि प्राध्यापक ही रिक्त पदे भरली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांनी तातडीने पदभरती करावी अन्यथा संबंधित महाविद्यालयांची ऑनलाइन सेवा बंद करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. डी. डावखर यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या विद्यापीठ आणि राज्य सरकारने निश्चित केल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील संबंधित विषयासाठी आणि पाठ्यक्रमासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, विद्यापीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्व संलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेस बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने पुणे, नाशिक वअहिल्यानगर या जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयांनी नियमित प्राचार्य, संचालक व प्राध्यापकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्याबाबतचे परिपत्रक 11 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, अनेक महाविद्यालयांनी या परिपत्रकाचे पालन केले नसल्याचे अधिकार मंडळाच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी रिक्त पदे न भरल्यास संबंधित महाविद्यालयांची ऑनलाइन सेवा बंद करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे.