इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे: केंद्र सरकारने देशभरात पंतप्रधान सूर्यघर योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे नागरिकांवरील वीजबिलाचा खर्च कमी होणार आहे. मात्र, आता महावितरणाने ‘टाइम ऑफ डे मीटर’ बंधनकारक केल्याने अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
असे’ आहेत नवीन टीओडी मीटरचे नियमः
पुणे परिमंडळात सध्या सुमारे ३१,००० टाइम ऑफ डे मीटर बसवलेले आहेत. नव्या नियमानुसार, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत तयार होणारी सौर ऊर्जा ग्राहकाच्या वापरलेल्या विजेतून वजा केली जाणार आहे. मात्र, संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ दरम्यान वापरलेली वीज कमी मागणीच्या वेळेत गणली जाईल आणि यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत.
टाइम ऑफ डे’ मीटरच्या नियमांचे परिणाम ‘काय’ होतील?
यापूर्वीच्या नेट मीटरिंग योजनेत मात्र अतिरिक्त सौर ऊर्जा ग्राहकाच्या खात्यात जमा होत होती. आणि वर्ष अंती त्याचे आर्थिक क्रेडिट ग्राहकाला मिळायचे. मात्र, नव्या टाइम ऑफ डे मीटर च्या नियमांमुळे दिवसा तयार झालेली अतिरिक्त वीज रात्रीच्या वीज वापरात जोडली जाणार नाही. यामुळे जर ग्राहकांनी रात्री अधिक वीज वापरली तर ग्राहकांचे बिल वाढू शकते. असे झाले तर सौर ऊर्जा पॅनेल लावूनही वीजबिल शून्यावर येणार नाही.
महावितरणने हा निर्णय का घेतला?
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर महावितरणवर आरोप करत म्हणाले, आता सौर ऊर्जेच्या वापरात वाढ होत आहे. त्यामुळे महावितरणचे उत्पन्न कमी होत आहे. आता टीओडी मीटरच्या नियमांद्वारे अटी टाकून ग्राहकांना मिळणारा फायदा कमी करण्याचा प्रयत्न महावितरण कडून केला जात आहे.
विवेक वेलणकर नागरिकांना आवाहन करत म्हणाले, महावितरणच्या वीज दरवाढ प्रस्तावाविरोधात सोमवारी (१७ फेब्रुवारी) पूर्वी हरकत नोंदवावी. तसेच, स्मार्ट मीटर किंवा स्मार्ट नेट मीटर बसविल्यानंतरही टीओडी मीटरनुसार बिल आकारले जाऊ नये आणि आधीच्या नियमांप्रमाणेच बिल देण्यात यावे, अशी मागणी करावी. असे आवाहन विवेक वेलणकर यांनी नागरिकांना केले आहे.