इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड : मळद (ता. दौंड) गावात आठ ते नऊ शालेय विद्यार्थिनींचे शिक्षकाकडून लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील मोठी माहिती समोर आली असून फरार झालेल्या मुख्य आरोपी बापूराव धुमाळ याला मध्य रात्री पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आरोपी बापूराव धुमाळ हा इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहे. आरोपी बापूराव धुमाळ याने सातवी, आठवी आणि नववीमध्ये शिकत असणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करत अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
दरम्यान, हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. या घटनेची माहिती मिळताच, दौंड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी फरार असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी मुख्य आरोपी बापूराव धुमाळ याला अटक केली असून या प्रकरणात गुन्हेगारांची संख्या दोन झाली आहे. सदर प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत.