इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड: केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. देशमुख हत्या प्रकरणामधील फोटो समोर आल्यावर सोमवारी (3 मार्च) रात्री उशिरा राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आज (दि. 4) धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना जवळचा सहकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या बीड जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे सांभाळत होता. त्यानंतर देशमुख हत्याप्रकरणात कराडचे नाव समोर आल्यापासून मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत होत होती.
परंतु, मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची फक्त चर्चाच सुरु होती. मात्र, सोमवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण आणखी संतप्त झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस यांना मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.