Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूज'मॉम इज इनसाइड डोन्ट गो'... असं लिहित संगणक अभियंता मुलाकडून वृद्ध आईचा...

‘मॉम इज इनसाइड डोन्ट गो’… असं लिहित संगणक अभियंता मुलाकडून वृद्ध आईचा निर्घण खून; कोंढव्यातील घटनेने खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात संगणक अभियंता मुलाने वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका सोसायटीत आईचा खून करून संगणक अभियंता मुलगा पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. लता आल्फ्रेड बेंझमिन (वय-७३, रा. कुबेरा गार्डन सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संगणक अभियंता तरुणाने दारुच्या व्यसनासाठी आईचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात मिळत आहे. ही घटना मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत मिलिंदची मोठी बहीण डॉर्थी मोजेस पनमोजेस (वय-४९, रा. सोलेस पार्क, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून लता यांचा मुलगा मिलिंद (वय-४३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडताच आरोपी मुलगा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉर्थी पनमोजेस या शिक्षिका आहेत. लता यांच्या पतीचे वीस वर्षांपूर्वी निधन झाले होते. लता यांच्या मुली सुश्मिता आणि डॉर्थी विवाहित आहेत. लता आणि त्यांचा मुलगा मिलिंद एनआयबीएम रस्त्यावरील कुबेरा गार्डन सोसायटीत राहायला आहेत. मिलिंद संगणक अभियंता असून बंगळुरूतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता. कोरोन संसर्गात त्याची नोकरी गेली होती.

त्यामुळे मिलिंद पुन्हा पुण्यात आला. नोकरी गेल्यानंतर तो दारुच्या आहारी गेला होता. त्याचा आईशी नेहमी भांडण व्हायचे. निवृत्तीनंतर लता एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पगारातून घरातील खर्च भागवला जायचा. २६ मे रोजी डॉर्थी यांनी आईशी संपर्क साधला असता त्यांच्याशी तीन दिवस संपर्क झाला नाही. त्यानंतर मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी लता यांच्या सदनिकेतून कुबट वास येत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी डॉर्थी आणि त्यांची बहीण सुश्मिता यांना दिली.

त्यानंतर रात्री डॉर्थी, सुश्मिता सदनिकेत गेले. तेव्हा प्रसधानगृहातील दरवाज्यावर मिलिंदने ‘मॉम इज इनसाइड डोन्ट गो’ असे लिहिले होते. प्रसाधनगृहाचा दरवाजा उघडल्यानंतर लता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे उघडकीस आले. मिलिंद आईचा मोबाइल संच घेऊन घरातून पसार झाल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments