Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजमेफेड्रोन प्रकरणी आणखी एक जण ताब्यात

मेफेड्रोन प्रकरणी आणखी एक जण ताब्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील तीन हजार ६०० कोटी रुपयांच्या मेफेड्रोन अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. सुनील बर्मन असे संशयिताचे नाव असून, तो या गुन्ह्यात फरार असलेल्या तस्कर सॅमच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ फेब्रुवारीला सोमवार पेठेतून सुरुवातीला एका आरोपीकडून सुमारे एक किलो मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतर हैदर शेखला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरात एका गोदामात छापा टाकला होता. त्या गोदामात मिठाच्या पोत्यांमध्ये ५५ किलो मेफेड्रोन लपवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी कुरकुंभ ‘एमआयडीसी’तील ‘अर्थकम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीतून सहाशे किलो, तसेच दिल्ली आणि सांगली परिसरात छापे टाकून एकूण तीन हजार ६०० कोटींचा मेफेड्रोनचा साठा जप्त केला होता.

दरम्यान, विश्रांतवाडीमधील गोदामाची जागा शोधण्यात आणि त्याठिकाणी मिठाच्या पोत्यांमध्ये मेफेड्रोन लपवून ठेवण्यात सुनील बर्मनचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यातील आरोपींकडून पश्चिम बंगालमधून नेपाळमार्गे मेफेड्रोनची तस्करी करण्यात येत होती. त्यामुळे पोलिस बर्मनच्या मागावर होते.

त्यासाठी गुन्हे शाखेचे पथक पश्चिम बंगालला गेले होते. बर्मनच्या ताब्यातून आणखी मेफेड्रोनचा साठा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात यापूर्वी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया (रा. पाटणा, बिहार) अद्याप फरार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments