इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खरा सूत्रधार असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडशी जवळीक असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असून मुंडे गुन्हेगार नाहीत, असं सांगत नामदेव शास्त्रीं यांनी मुंडेंची पाठराखण केली आहे. मात्र, नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची पाठराखण करताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, “भगवान गड हे पवित्र ठिकाण आहे. या गडावरून राजकारणावर बोलण्याची गरज नव्हती. नामदेवशास्त्रींना या सगळ्या प्रकरणाची माहिती नसल्यामुळे ते बोलले असतील”, असं दमानिया यांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी (ता.30) भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी मुंडेंनी आपली बाजू त्यांच्याजवळ मांडली. त्यानंतर आज नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असल्याचं स्पष्ट केलं. तसेच धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही किंवा ते गुन्हेगार नाहीत. या सर्व प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी सांप्रदायावर देखील झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंची मिडियावर ट्रायल झाल्याचं देखील शास्त्रींनी सांगितलं आहे. त्यावर अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना धनंजय मुंडेंची दुसरी बाजू माहिती नसल्याचं सांगितलं.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
नामदेव शास्त्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, भगवान गड हे आपल्या सर्वांसाठी एक पवित्र स्थान असून अशा ठिकाणाहून एखाद्या राजकारण्याची पाठराखण केल्याचं पाहून मला वाईट वाटलं आहे. आपण कोणीही असो किंवा धनंजय मुंडे देखील ज्यावेळी मंदिरात जातात. तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. त्यामुळे नामदेव शास्त्रींनी त्यांचं ते वागणं बघितलं असावं.
परंतु, त्यांची दुसरी बाजू त्यांना कदाचित माहीत नसल्यामुळे त्यांनी मुंडेंची पाठराखण केली असावी. शिवाय या प्रकरणाची माहिती तुम्हाला नसेल तर मी तुमच्यापर्यंत सर्व कागदपत्र पोहोचवेन. मुंडेंविरोधात बोलणारे जे लोक आहेत ते कोणत्याही आकसापोटी बोलत नसून जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवत आहेत. राजकारण हे वेगळं असतं. त्यामुळे त्यांनी पवित्र भगवान गडावरुन अशी भूमिका घ्यायला नको होती, असं म्हणत दमानिया यांच्याकडून आपली नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.