इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : स्पर्धा परीक्षेची (Pune Crime) तयारी करण्यासाठी गावाकडून पुण्यात आलेल्या सहा तरुणींपैकी पाच जणींवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth) एका वन रुम किचनमध्ये त्या सर्वजणी राहून अभ्यास करत होत्या. मात्र किरकोळ कारणावरून झालेला वाद हातघाईपर्यंत पोहोचल्याने ही कारवाई करण्यात आली. एमपीएससीसाठी पात्रतेची अट म्हणजे उमेदवारावर कोणताही गुन्हा नोंद नसणे. त्यामुळे या प्रकरणामुळे संबंधित तरुणींच्या भवितव्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
२३ वर्षांच्या एका तरुणीने आपल्या सहकारी पाच जणींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिच्या मते, मागील काही दिवसांपासून त्या एकत्र येऊन वाद घालत होत्या. १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता वाद शिगेला पोहोचला. दुपारी चिकन शिजवल्यानंतर बेसिन साफ केले नाही, या क्षुल्लक कारणावरून स्नेहल नावाच्या मुलीने मोठमोठ्याने शिवीगाळ केली. यावर फिर्यादीने विरोध केल्यावर वाद चिघळला.
फिर्यादीच्या आरोपानुसार, स्नेहलने तिला भिंतीवर ढकलून दाबून धरले, तर इतर चौघींनी गालावर चापट्या मारल्या. त्यानंतर तिला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी तिने मोठ्या मुश्किलीनं सुटका करून घेतली आणि बाहेर पळून जाऊन ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी या पाच तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार एस. व्ही. पाटील करत आहेत. विद्यार्थिनींच्या एका क्षुल्लक वादातून एवढा गंभीर प्रसंग निर्माण झाल्याने विद्यार्थी वसतीगृहांमधील वातावरण, ताणतणाव आणि परस्पर संवाद या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.