इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सातारा : महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून घमासान सुरू असतानाराज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ‘मला साताऱ्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी मी कधीही केलेली नाहीं’ असे विधान केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दुसऱ्यांदा साताऱ्याचे पालकमंत्री केले आहे, त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन मी साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडणार असल्याची देसाई यांनी म्हटले आहे. कराड येथील शासकीय विश्रामृहात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘मला पालकमंत्री करा’ अशी कधीही मी मागणी केली नव्हती. पण, शिंदे यांनी दुसऱ्यांदा मला साताऱ्याचे पालकमंत्री केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन पालकमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडणार असून मी जेव्हा दुसऱ्यांदा साताऱ्याचा पालकमंत्री झालो, त्यावेळी मला फारसे वेगळे काही वाटले नाही. कारण, गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून मी पालकमंत्री होतो. त्यामुळे या जबाबदारीचे मला विशेष असे काही वाटले नाही, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
खासदार उदयनराजे भोसलेंकडून माझे अभिनंदन
मंत्री देसाई म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत येऊन माझे अभिनंदन केले. त्यांनी सातारा जिल्ह्यातील अन्य मंत्री आणि आमदारांचेही स्वागत केले. ते काही वेळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही बसून होते. त्यांनी जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले आहे, असेही देसाई यांच्याकडून सांगण्यात आले.
पालकमंत्रिपदाची मागणी कोणाकडून करण्यात आली
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची मागणी कोणाकडून करण्यात आली होती, हे सर्वांना माहितीच आहे. पण, मागणी कोण करतंय, त्यावरही बरंच अवलंबून असते. कोणी कोणासाठी मागणी केली आहे, हे आपल्याला माहितीच आहे. साताऱ्याच्या पालकमंत्रिपदावरून उठलेल्या वादंगावर कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन मी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मला साताऱ्याचे पालकमंत्री केले आहे, त्यांच्या विश्वासाला पात्र राहून चांगले काम करून दाखवणार आहे, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.