इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामतीः विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर काका अजित पवार व पुतणे युगेंद्र पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आमने-सामने ठाकणार आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची अवस्था श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगरसारखी होऊ देणार नाही. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गट व संभासदांनी आंदोलन केले होते. याबाबत युगेंद्र पवार यांनी पुढील रणनीतीबाबत पत्रकारांशी बोलले.
युगेंद्र पवार म्हणाले की, माळेगाव कारखान्यावर झालेले आंदोलन शरद पवार गटाकडून झाले, असे मी म्हणणार नाही. स्थानिक सभासद आहेत. हे कुठल्याही पक्षाचे नव्हते. आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शरद पवार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असतात. सभासदांनी एकत्र येऊन आंदोलन केले. ते सगळ्या पक्षांचे होते. त्यांनी इथे राजकारण आणायला नको होते. एक तर कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही, नीरा नदी एवढी दूषित करून ठेवली आहे. ऊसाला एकदा दर दिला, म्हणून दरवर्षी तेच सांगत बसायचे, असे नसते.
पंधरा वर्षांपूर्वी छत्रपती कारखानासुद्धा सर्वात जास्त दर देत होता, आज काय अवस्था झाली, मी खांडज गावात भेट दिली. तिथे दूषित पाण्याने मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. माळेगाव सोमेश्वर कारखान्याच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. सक्षम उमेदवार मिळत असतील, जर आपण हा कारखाना वाचवू शकलो, छत्रपती कारखाना होण्यापासून जर थांबवू शकलो, तर मग काय हरकत आहे? असा सवाल युगेंद्र पवार यांनी केला.
मी बोलायला लागलो, तर अवघड जाईल…
आपल्याला शरयू कारखान्याच्या भावाबाबत माळेगावचे अध्यक्ष केशव जगताप यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केशवबापू त्यांना पण सांगा, माझ्या कारखान्याला तालुक्यात आपण एक नंबर भाव दिला आहे. तो खासगी कारखाना आहे. माळेगाव हा सहकारी कारखाना आहे. त्यांचे पण भरपूर खासगी कारखाने आहेत. त्यांचे म्हणजे केशवबापूंचे नाहीत. पण, तुम्ही समजून घ्या. मी आज कर्जाने तिथे एक कारखाना काढला आहे. कष्टाने मी तो कारखाना चालवतो. त्यांचे आठ-दहा कारखाने आहेत. जर मी बोलायला लागलो, तर केशवबापूंना ते अवघड जाईल. त्याच्यामुळे त्यांना विनंती करतो, अजून हा विषय वाढवण्यापेक्षा केशवबापूंनी हा विषय तिथेच थांबवावा, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.