इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास अजूनही धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक भागांमध्ये पावसाने हूल दिली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगड या किनारपट्टीच्या भागांसाठी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्याच्या भागात विजांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.
सांगली, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवसांत विजा, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. शनिवार आणि रविवारी काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीत शनिवारपर्यंत मध्यम पावसाची शक्यता असून, त्यानंतर या भागांमध्येही पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
विदर्भातही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडणार असून अनेक भागांना गडगडाटांसह वादळी वाऱ्यांचा धोका आहे. काही भागांमध्ये शनिवारपासून पावसाचा जोर कमी होऊ शकतो, मात्र पावसाची शक्यता कायम राहील. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.