इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागूल यांच्या मुलाने दुचाकीचालकाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. तक्रारदाराने नंतर पोलीस आयुक्तांची भेट घेत घडलेला प्रकार त्यांच्यासमोर मांडला. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
तक्रारदार फय्याज सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आबा बागूल यांच्या राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होत नाही. आबा बागूल यांचा मुलगा हेमंत बागूल यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे. हेमंत बागूल यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार सय्यद यांनी बंडगार्डन पोलिसांकडे दिली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्येदेखील कैद झाला आहे.
तर, याबाबत हेमंत बागूल यांनी खुलासा करताना सांगितले की, सिग्नल लागल्याने माझे वाहन थांबलेले असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करून डाव्या बाजूने ओव्हरटेक करून तक्रारदाराने माझ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यातून त्याला जाब विचारला असता त्याने अरेरावी केली. त्याने दादागिरी करत शिवीगाळही केली. त्यातून हे घडले. ज्या वेळी त्याला कळलं की मी आबा बागूल यांचा मुलगा आहे, त्यामुळे त्याने प्रसिद्धीपोटी किंवा प्रतिमा मलीन करण्यासह आर्थिक लाभापोटी हा खटाटोप केला आहे.