इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र प्रांताच्या राज्य सचिवपदी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची निवड झाली आहे. रविवारी सेलू येथे पार पडलेल्या माकपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात नवले यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीने कम्युनिस्ट पक्षाचे देशातील सर्वांत कमी वयाचे राज्य सचिव बनण्याचा मान नवले यांनी पटकावला आहे.
माकपचे राज्य अधिवेशन सेलू (परभणी) येथे २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी पार पडले. या तीन दिवसीय अधिवेशनासाठी राज्यभरातून ३३७ प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी सामाजिक, राजकीय आठ ठराव मांडून एकमताने पारित करण्यात आले. या अधिवेशनात मुख्य राजकीय आणि संघटनात्मक अहवाल मावळते राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी मांडला. या अहवालावरील चर्चेत ५९ प्रतिनिधींनी भाग घेतला. या अधिवेशनात माकपच्या ५० सदस्यांची नवीन राज्य कमिटी आणि १५ सदस्यांचे राज्य सचिव मंडळ निवडण्यात आले. या अधिवेशनात पॉलिट ब्युरो सदस्य आणि पक्षांचे समन्वयक प्रकाश कारत, पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू, पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे उपस्थित होते.