इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खेड-शिवापूर, ता. 3 : आळंदी ते पंढरपुर पालखी सोहळ्यात यंदामाऊलींच्या पालखीत नवीन हिरा या अश्वाचे आगमन होणार आहे. या अश्वाचा माऊली अर्पण सोहळा नुकताच गाऊडदरा (खेड-शिवापूर, हवेली) येथे पार पडला. यावेळी अंकलीच्या शितोळे सरकार यांच्यातर्फे आलेले माऊली अश्वाचे स्वार तुकाराम कोळी, अक्षय परीट यांच्याकडे हा अश्व सुपुर्द करण्यात आला.
गाऊडदरा येथील दूध व्यावसायिक कैलास आणि रामदास ओंबळे यांनी अश्वाचे प्रशिक्षक स्वप्नील उणेचा यांच्याकडून कर्नाटकातून हिरा हा अश्व घेतला होता. ओंबळे यांच्याकडून तो मुंबईतील आगरी समाजाचे कल्याण चिकनघरगाव येथील बांधकाम व्यावसायिक सखाराम भोईर यांनी हा अश्व घेऊन माऊली चरणी अर्पण केला आहे. शितोळे अंकली (बेळगांव) येथील उर्जितसिंह आणि महादजी शितोळे सरकार यांच्याकडे अश्वाचा मान पालखीत असतो.
सध्या हा अश्व 7 वर्षाचा आहे. स्वारीच्या अश्वाचे रिंगण हे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असते. हा अश्व सदृढ आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते. ओंबळे बंधू यांनी हिरा या अश्वाला जीवापाड सांभाळले आहे. अश्वाची रपेट, त्याचा खुराक, स्वच्छता, आरोग्याची काळजी या गोष्टींची विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्व म्हणून ओंबळे यांच्याकडील हीरा या अश्वाची निवड करण्यात आली आहे.
गाऊडदरा येथे नुकताच या अश्वाचा अर्पण सोहळा पार पडला. यावेळी बाळासाहेब ओंबळे, कमल ओंबळे, कैलास ओंबळे, रामदास ओंबळे, भोईर यांच्या कुटुंबातील सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.