Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजमाऊलींच्या पालखीचा दिवे घाटातून प्रवास; विठुनामाच्या गजरात वारकरी दंग

माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातून प्रवास; विठुनामाच्या गजरात वारकरी दंग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्‌गुरु संत तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम मंगळवारी लोणी काळभोरला राहणार आहे. तर माऊलींची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड मुक्कामी पोहोचणार आहे.

पंढरीच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीतला दोन दिवसांचा मुक्काम उरकून पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या जयघोषाने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पहाटेची आरती झाल्यानंतर संतांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या रथावर ठेवण्यात आल्या.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी पुण्यात दाखल झाला होता. पालखी सोहळ्यात दाखल झालेल्या हजारो दिंड्या शहराच्या विविध भागात विखुरल्या होत्या. त्या मंगळवारी पुन्हा एकवटल्या आणि पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्या.

दरम्यान, हिरवाईने नटलेल्या दिवे घाटाचा प्रवास वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असतो. दिवेघाटातून ही पालखी जाणार असून माऊलींच्या पालखीचा हा सर्वात सुंदर आणि अवघड असा टप्पा मानला जातो. यंदाही हीच पर्वणी अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी हा घाट ओलांडणार आहेत. ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष आणि विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांचा भक्ती सागर पुढच्या गावी जाऊन विसावतो.

यंदाही वारीच्या सुरवातीपासूनच पावसाचे आगमन झाले आहे. नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यातून सुरु असलेला वारक-यांचा प्रवास त्यात रिमझिम पाऊस यामध्ये निघालेला वैष्णवांचा मेळा भक्तीत तल्लीन झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments