इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
योगेश मारणे / न्हावरे : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरातील टेंभेकरवस्ती येथील घराच्या अंगणात खेळत असलेल्या ४ वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवतेज समाधान टेंभेकर (वय-४ वर्षे, मु. रा. फराटेवाडी, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
ही घटना आज (दि. १५) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नरभक्षक बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला करून फरफटत नेले. या घटनेने परिसरात भीतीचे वातवरण पसरले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवतेज हा टेंभेकरवस्ती येथील घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर चिमुकल्याला जवळच्या उसाच्या शेतात फरफटत नेले. त्यानंतर सुमारे दिड तासाने मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला.
या हल्यात मुलाचे धडापासून मुंडके वेगळे झाले आहे. अशा अवस्थते मृतदेह सापडल्याने नागरीक आक्रमक झाले होते. दरम्यान, घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी आक्रमक होऊन वन विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.
गोकुळनगर परिसरात १९ ऑक्टोबर रोजी वंश सिंग या मुलावर देखील बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला होता. या घटनेला एक महिना होत नाही तोच ही दुसरी घटना घडली आहे. वन विभागाला एक महिन्यात १४ पिंजाऱ्यांमध्ये एकही बिबट्या जेरबंद करण्यासाठी यश आलेले नाही, तसेच सुरुवातीला बिबट्याला जेरबंद करण्याठी वन विभागाला भक्ष्यच मिळाले नव्हते. त्यानंतर वन विभागाने अनेक प्रयत्न करूनही वन विभागाला एकही बिबट्या अद्यापपर्यंत पकडता आलेला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ वन विभागाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.