इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे महानगरपालिकेत दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदावर आता पालिकेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला संधी मिळाली आहे. त्यानुसार शासनाकडून उपायुक्त महेश पाटील यांची पुणे महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त म्हणून ऑर्डर काढण्यात आली आहे. या ऑर्डरनंतर आता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाटील यांना अतिरिक्त आयुक्त विशेष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महानगरपालिकेत उपायुक्त पदावरून पदोन्नती मिळालेले पाटील हे दुसरे अधिकारी आहेत. यापूर्वी मिळकत कर विभागाचे प्रमुख विकास कानडे यांना उपायुक्त पदावरून अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्याला आता अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने कामगारवर्गात आनंदाचे वातावरण आहे. महेश पाटील यांच्याकडे दक्षता विभागाच्या उपायुक्तपदाची जबाबदारी होती. डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात पार पडलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे समन्वयक म्हणूनही पाटील यांनी चांगली कामगिरी पार पाडली होती. सलग दोन वर्षे त्यांनी ही कामगिरी चांगल्या पद्धतीने पार पाडली होती.
पुणे महानगरपालिकेत सध्या अतिरिक्त आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी. पी. हे कार्यरत आहेत. दोन अतिरिक्त आयुक्तांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे कामाचा ताण हा आयुक्तांवर पडत होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे पुणे महानगरपालिकेसाठी अतिरिक्त आयुक्तपदावर तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली होती. पुणे महानगरपालिकेतील सर्व विभागांतील वरिष्ठ अधिकारी हे मराठा समाजाचे आहेत. त्यात आता आणखी एका मोठ्या पदावर मराठा समाजातील अधिकाऱ्याला संधी मिळाली आहे.