Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमहिला मुलींनी निर्जन ठिकाणी जाणे टाळण्याची गरज.....

महिला मुलींनी निर्जन ठिकाणी जाणे टाळण्याची गरज…..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती – विमानतळानजिक मित्र मैत्रीणींना लुटण्यासह त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या घटनेची बारामती व पंचक्रोशीत जोरदार चर्चा झाली. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्यासह मुलींनी निर्जन ठिकाणी फिरायला जाणे कितपत सुरक्षित आहे या वरही बारामतीत मोठी चर्चा झाली.

शुक्रवारी (ता. 10) बारामती विमानतळाच्या धावपट्टीनजिक मित्र मैत्रीणीना मारहाण करत दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले, शिवाय दोघांचेही आक्षेपार्ह स्थितीत मोबाईलमध्ये फोटोही काढून घेतले. या घटनेचे बारामतीत जोरदार पडसाद उमटले.

मुलींच्या सुरक्षिततेसोबतच मुलींनीही निर्जन ठिकाणी जावे का, याचीही मोठी चर्चा झाली. अनेकदा मुले मुली एकांत मिळावा या उद्देशाने शहराबाहेर किंवा निर्जन ठिकाणी जातात, अनेकदा अशा जोडप्यांना लुटल्याच्या घटना घडतात. या बाबत पोलिसांसह पालकांनी सांगूनही ऐकले जात नसल्याचे पुढे आले आहे. घाटात, जंगलात, रस्त्याच्या कडेला अत्यंत निर्जन ठिकाणी अशी जोडपी एकांत शोधायला जातात, अनेकदा नको त्या प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागते.

मुलींची सुरक्षितता महत्वाची असली तरी कोणालाही कसलीही कल्पना न देता अशा ठिकाणी जाणे धोकादायक आहे हे माहिती असतानाही अनेक मुली व महिलाही असा धोका पत्करतात, ही बाब समोर येत असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. पालकांनी मुलींना निर्जन ठिकाणी जाण्यापासून रोखावे व मुलींसह महिलांनीही अशा ठिकाणी जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

जेथे मदतीला कोणीच येऊ शकणार नाही अशा ठिकाणी जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षितता गरजेची असली तरी निर्जन ठिकाणी अशी सुरक्षितता पुरविणे अशक्य असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.

काळजी घ्यायला हवी…

निर्जन ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, आपण कोठे जातो याची पालकांना माहिती हवी, संकटसमयी पोलिसांची मदत जरुर घ्यावी. जेथे तातडीच्या मदतीची गरज असेल तेथे 112 नंबरवर डायल केल्यास अशी मदत पोलिस तातडीने करतील- संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments