Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमहिला उद्योजिकेची यशोगाथा : नव्या व्यवसायाला 'जेनेरिक'ची मात्रा; औषधविक्रीतून देशात सर्वाधिक उलाढाल

महिला उद्योजिकेची यशोगाथा : नव्या व्यवसायाला ‘जेनेरिक’ची मात्रा; औषधविक्रीतून देशात सर्वाधिक उलाढाल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : नव्या क्षेत्रात करिअर करायचं होत म्हणून आयटीतील नोकरी सोडली. घरातील सोनं विकून स्वतःचा जेनेरिक औषधांचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाची ऊर्मी आणि गरजवंतांना अल्पावधीत औषधे उपलब्ध करून देण्याची जिद्द,

यामुळं एका महिलेने सुरू केलेला व्यवसाय आज उलाढालीच्या बाबतीत देशात सर्वोच्च पातळीवर पोहोचला. विशेष म्हणजे एक पाय ४५ टक्के अपंग असतानाही सात वर्षांच्या कालावधीत त्यांनी हा टप्पा गाठला.

कविता गोसावी असं त्या उद्योजिकेचं नाव आहे. २०१७मध्ये त्यांनी येरवड्यात ‘येरवडा जेनेरिक मेडिसिन स्टोअर’ नावाने दुकान सुरू केलं. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा नऊ हजारांचा व्यवसाय झाला. सहा महिन्यांतच त्यांचे दुकान राज्यात सर्वाधिक उलाढाल करणारे ठरले. सुमारे ८० लाखांच्या खरेदी-विक्रीचा टप्पा पार केला.

कविता यांचा औषधविक्रेत्यांना सल्ला

• विक्रेत्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे

• नागरिकांमध्ये जेनेरिक औषधांबाबत जनजागृती करावी

• जेनेरिक गोळ्यांबाबत विश्वास निर्माण करून द्यावा

• जनजागृतीमध्ये सातत्य ठेवावे

पैशांबाबत घरी माहीत नव्हते…

मराठी माणसाला उद्योग-व्यवसाय जमेलच असे नाही. तुम्ही सर्व बचत एकाच धंद्यात गुंतवली आणि त्याला यश आले नाही; तर मोठे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ‘तू नोकरी कर’ असे मला कुटुंबीयांनी सुचवलं. मात्र व्यवसाय करण्याचं आम्ही निश्चित केले होतं. माझी ५० हजारांची बचत आणि पतीची नोकरी गेलेली असताना आम्ही दुकान सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम होतो.

सुरुवातीला भांडवलाची कमतरता होती. त्यामुळे आम्ही सोनं विकलं. त्याबाबतची माहिती कुटुंबीयांना न देता उद्योग सुरू केला. सुरुवातीचे सहा महिने आम्ही घरच्यांना पैसे कुठून आणले हे सांगितले नव्हतं. सर्व सुरळीत झाल्यानंतर आम्ही घरच्यांना माहिती दिली, असे कविता यांनी सांगितलं.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर मी पुणे आणि मुंबईत अनेक बड्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१७ मध्ये माझ्या आईला रुग्णालयात दाखल केलं. त्या वेळी लक्षात आलं की अनेकांना वैद्यकीय खर्च परवडत नाही. महागड्या गोळ्या घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गरिबांसाठी किंवा कमी पैसे असलेल्यांसाठी जेनेरिक औषधांचं दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments