Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजमहाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी विरोधात होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित; कंपनी दहा...

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी विरोधात होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित; कंपनी दहा दिवसांसाठी बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती: दि. २६ रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील घातक कचऱ्याचे विल्हेवाट लावणारी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले. यामुळे या कंपनी विरोधात शिरूर ग्रामीण ग्रामस्थांसह इतर गावच्या ग्रामस्थांनी दि. २८ ऑगस्ट रोजी पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीत विविध कंपनीतील घातक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यासाठी नियमावली आहे. मात्र गेली अनेक वर्षांपासून ही कंपनी नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे. असा ग्रामस्थांचा आरोप आहे. याचा परिणाम आसपासच्या गावातील विहिरी व ओढ्यांचे स्त्रोत दूषित झाले आहेत. जमिनी नापीक झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील खराब झाले आहे. यामुळे या गावातील नागरिक अनेक आजारांना बळी पडत आहेत. याची शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने गंभीर दखल घेऊन दि. २८ रोजी या कंपनी विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात शिरूर ग्रामीण सह सरदवाडी, कर्डेलवाडी, रांजणगाव गणपती, कारेगाव, अण्णापुर, ढोकसांगवी, निमगाव भोगी, तसेच फलके मळा आदी गावचे ग्रामस्थ, एमआयडीसीचे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पोलीस विभागाचे अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांनी एम ई पी एल कंपनी कायमची बंद करावी तसेच त्यांना देण्यात येणारे वाढीव ५२ एकर क्षेत्र रद्द करावे. अशी मागणी केली. यावर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी कंपनीकडून अटी व शर्ती भंग झाल्याचे निदर्शनास आल्याचा तसेच वाढीव क्षेत्र कंपनीला देऊ नये, असा अहवाल तात्काळ वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल. असे बैठकीत सांगितले.

कंपनी बाहेर सोडत असलेले पाणी दूषित आढळल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याने प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश बारवकर यांनी यावेळी दिले. कंपनीचे अधिकारी आसिफ हुसेन यांनीही कंपनी बंद ठेवण्याचे मान्य केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी चंद्रकांत साळुंखे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, माजी जि प सदस्य शेखर पाचुंदकर, माजी प. स. उपसभापती वाल्मीकराव कुरुंदळे, सदस्य आबासाहेब सरोदे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान बारवकर यांनी दिलेल्या या आदेशामुळे २८ ऑगस्ट रोजी नियोजित कंपनी विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी जाहीर केले. कंपनीच्या प्रदूषणामुळे आसपासची तसेच पंचक्रोशीतील गावातील जमीन तसेच पाण्याची वाताहात झाली असून ही कंपनी जोपर्यंत कायमची बंद होत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, आम्ही मागे हटणार नाही. असा निर्धार उपसरपंच वर्षे यांनी यावेळी ग्रामस्थांच्या साक्षीने केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments