इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 2000 साली पाण्याची मीटर बसवले होते. मात्र मीटरची योजना काही कालांतराने बंद करण्यात आली. मात्र तरीदेखील नागरिकांना पाण्याची बिले येतच आहेत. आता याप्रकरणी महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्याची मागणी नागरी हक्क संस्थेने महापालिकेकडे केली आहे.
महापालिकेकडून ज्या पत्त्यावर पाण्याची बिले पाठवली जात आहे त्या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने ही बिले भरली जात नाहीत. अशी कितीतरी बिले पडून राहत असतात, त्यामुळे ही थकबाकी दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबंधित व्यक्ती ठिकाणी राहते की नाही याची खात्री करावी. तसेच या ठिकाणचा पाणीपुरवठा खरंच मीटरने सुरू आहे का याची तपासणी करावी अशी मागणी आता नागरी हक्क संस्थेने महापालिकेकडे केली आहे. संस्थेचे सुहास कुलकर्णी यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या पाणीपट्टीच्या थकबाकीमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरी हक्क संस्थेने ही मागणी केली आहे. पाणीपट्टी भरली जात नाही म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून दिले जाते. या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना पाण्याची बिले देण्यापूर्वी या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी नागरिक संस्थेने महापालिकेकडे केली आहे.