इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात “जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत सातबारा उताऱ्यातील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वारसांना येणारी अडचण दूर होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातबारातील मयतांच्या नावामुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्या अंतर्गत एक एप्रिल पासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या या आदेशानुसार तहसीलदारांची समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारा यावर लावण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सातबारा अद्ययावत होणार आहे.