Monday, September 9, 2024
Homeक्राईम न्यूजमला राज्यातलं सरकार बदलायचंय; शरद पवारांचं इंदापूरात मोठं विधान

मला राज्यातलं सरकार बदलायचंय; शरद पवारांचं इंदापूरात मोठं विधान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महाराष्ट्रात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुतीसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणूक ठाकरे आणि पवारांसाठी अस्तित्वाची लढाई बनली होती. मात्र, या दोन्ही नेत्यांनी सर्व दावे आणि एक्झिट पोल खोटे ठरवत दमदार विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्यात नऊ, तर शरद पवारांच्या पक्षाने आठ जागा जिंकल्या आहेत. आता हे दोन्ही नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

शरद पवारांनी तर आत्तापासूनच गाव भेट दौरे सुरु केले आहेत. पवारांनी वेगवेगळ्या गावांमधील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आज इंदापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पवार म्हणाले कि, चार-पाच महिने थांबा, मला राज्यातलं सरकार बदलायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे तशी धोरणं घेता येत नाही पवारांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

गेली दहा वर्ष सत्ता होती पण आज चित्र बदलले आहे. आज लोकांनी सत्ता त्यांच्या हाती दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचे सरकार झाले नसते. त्या दोघांच्या मदतीने आज त्याठिकाणी सरकार झालं आहे. समाजाच्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र पुढे घेऊन जायचं ही विचारधारा आपल्या सर्वांच्या अंतःकरणात आहे. नेमके त्याविरोधी काम आजचे राज्यकर्ते करत आहेत असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले, मला महाराष्ट्राच्या विधानसभेत, देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषदेत जाऊन यंदाच्या वर्षी ५६ वर्षे झाली. या काळात एकही दिवसाचा खाडा न घेता निवडून आलेला दुसरा कुणी नाही. त्यामुळे या काळात अनेक पंतप्रधान पाहिले. पक्षभिन्नता असेल पण देशाचा विचार कुणी सोडला नाही. समाजातील सगळ्या धर्माच्या, जातीच्या भाषेच्या लोकांबद्दल त्यांना एक प्रकारची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती. पण त्यांची निर्णय पद्धत समाजातील काही घटकांबद्दल मनामध्ये आकस असावा अशी होती असं म्हणत पवारांनी नरेंद्र मोदींवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, देशातील राजकारण बदलत आहे, गेले १० वर्ष विशिष्ट राजवट देशामध्ये होती. आजही त्यांच्या हाती सत्ता गेली आहे. मात्र, १० वर्षाची सत्ता आणि यावेळच्या सत्तेत फरक आहे. देशातील राज्यातील विरोधी पक्षाचे लोक एकत्रित करणे, विरोधासाठी विरोध नाही तर राज्यातील जनतेच्या हिताची जपणूक करणे, जर राज्यकर्त्यांकडून होत नसेल तर गप्प बसायचे नाही, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments