इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पळसदेव : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील मराठा, कुणबी व कुणबी मराठा या समाजातील नागरिकांसाठी पशुपालन आधारित मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती एमसीईडी चे प्रकल्पाधिकारी मदनकुमार शेळके यांनी दिली.
राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाची आक्रमकता पाहून शासनाने मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये शेतकरी मराठा समाजातील नागरिकांसाठी मोफत पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एमसीडी चे विभागीय अधिकारी अभिराज डबीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात बारामती येथे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना मदनकुमार शेळके यांनी सांगितले की सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 18 ते 45 वर्ष या वयोगटातील दरम्यानच्या नागरिकांना सहभाग घेता येणार आहे.
प्रशिक्षण दरम्यान शेळीपालन, कुकुटपालन, गाय म्हैसपालन, चारा व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन आदि व्यवसायासाठी शासनाच्या विविध अनुदान योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी पात्र व गरजू लाभार्थी नाव नोंदणीसाठी कार्यक्रम समन्वयक रामदास पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी शेळके यांनी केले.
मराठा समाजातील बहुतांशी नागरिक शेती व शेतीपूरक व्यवसाय करून आपली उपजीविका करत असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे सारथीच्या माध्यमातून शेतकरी मराठा, कुणबी समाजाची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने महाराणी सईबाई महिला सबलीकरण योजनेअंतर्गत एक महिन्याच्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. तरी गरजूंनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सारथी व एमसीडी च्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी 9850001170 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.