इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः दिवसेंदिवस पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा ताण वाढत आहे. यामुळे रेल्वे सेवा पुरवताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांमुळे पुणे आणि परिसरातील चार स्थानकांचा टर्मिनल म्हणून विकास करण्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून नियोजन सुरू आहे. याबाबतची नुकतीच घोषणा त्यांनी लोकसभेतून केली होती. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी पुणे विभागातील खडकी, हडपसर आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांच्या विकासकामांची पहाणी केली. यासोबतच त्यांनी पुणे मुख्यालयात विभागातील अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मध्य रेल्वे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आदी उपस्थित होते.
पुणे रेल्वे स्थानकावरून गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ही घोषणा झाल्यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी पुणे विभागात येऊन खडकी, हडपसर आणि शिवाजीनगर टर्मिनलच्या कामाची पहाणी केली. त्यावेळी याचा विकास करताना आणखी काय उपाययोजना करता येतील, याचा त्यांनी आढावा घेतला.