Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजमंडल अधिकारी जयश्री कवडेविरुद्ध लाच प्रकरणी दोन तक्रारी दाखलः दोन दिवसांपूर्वीच झाली...

मंडल अधिकारी जयश्री कवडेविरुद्ध लाच प्रकरणी दोन तक्रारी दाखलः दोन दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई; साथीदारांना अटकही झाली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

थेऊरमधील मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. एका तक्रारीत 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी कवडे यांच्यासह तिघांना सापळा रचून रंगेहाथ कारवाई केली गेली. तर दुसऱ्या तक्रारीत सापळा लावण्याची कारवाई झाली नाही. परंतु, कवडे यांच्यासाठी लाच मागणाऱ्या मध्यस्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

एका तक्रारदारास शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी कवडे, खासगी संगणक चालक योगेश कांताराम तातळे (वय 22, रा. दिघी) आणि मध्यस्थ विजय सुदाम नाईकनवरे (वय 38, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांच्याविरुद्ध अटक कारवाई करण्यात आली होती.

शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आजीच्या वडिलांचे नाव कमी झाल्याचे तक्रार तरुणाला दिसून आले होते. ते नाव पुन्हा लावण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. तहसीलदारांनी नाव पुन्हा लावण्याचे आदेश दिले होते.

तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदीप्रमाणे नोंदी घेण्यासाठी तक्रारदार हे मंडल अधिकारी कवडे यांना भेटले. त्यांनी विजय नाईकनवरे याला भेटण्यास सांगितले. त्याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात लाच घेताना पकडले. तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तर दुसऱ्या एका प्रकरणात तक्रारदाराने लोणी काळभोर परिसरातील कोलवडी या गावात एक जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद, तसेच फेरफार मंजूर करण्यासाठी थेऊर मंडल अधिकारी कवडे यांच्याकडे अर्ज केला होता. विजय नाईकनवरे याने तक्रारदारांकडे 80 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

त्याची पडताळणी 15 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीत प्रत्यक्ष सापळा कारवाई पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या तक्रारीत विजय नाईकनवरे याच्यासह मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. लाच मागितल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments