इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मंचरः पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. डिंभे गावातील एका स्थानिक हॉटेलमधून खरेदी केलेल्या लाडवामध्ये चक्क मानवी बोट (अंगठा) आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर आणि स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
डिंभे गावातील एका हॉटेलमधून खाण्यासाठी गोहे बुद्रुक येथील रहिवासी असलेले रामचंद्र पोटकुले यांच्या कुटुंबीयांनी लाडू खरेदी केले होते. हे लाडू घरी आणून खाण्यास सुरुवात केली असता, एका लाडूमध्ये मानवी बोट (अंगठा) आढळला. हे पाहून पोटकुले कुटुंबीय प्रचंड घाबरले आणि त्यांना मोठा धक्का बसला. हा धक्कादायक प्रकार समोर येण्यापूर्वी कुटुंबातील काही सदस्यांनी हे लाडू खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे की, हॉटेलमध्ये लाडू बनवताना मशीनचा वापर केला जात असावा. कदाचित, मशीनमध्ये लाडू तयार करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा अंगठा मशीनमध्ये अडकून तुटला असावा.
या किळसवाण्या घटनेनंतर डिंभे परिसरातील ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी संबंधित हॉटेलवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.