इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दोन वेळचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू महेश लांडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांनी भोसरीत कडवे आव्हान उभे केले. सध्या तरी भोसरीत लांडगे चौथ्या फेरीअखेर १३,००० मतांनी आघाडीवर आहेत. तर गव्हाणे यांना २६,००० मतं मिळाली आहेत. महेश लांडगे यांना ३९, ००० मतं मिळाली आहेत. भाजपचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि लांडगे यांची ताकद असलेल्या मतदारसंघात दहा वर्षांचे प्रलंबित मुद्दे घेऊन गव्हाणे रिंगणात उतरले. त्यातच शरद पवार यांची सभा झाल्यानंतर वातावरण फिरल्याची चर्चा झाली. त्यामुळे भोसरीत यंदा तुतारी वाजणार की, पुन्हा कमळ फुलणार याककडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विकासकामांचा फायदा लांडगे यांना
भोसरी मतदारसंघात दोनवेळा महेश लांडगे निवडून आले. दहा वर्षांतील विकासकामे जनतेपुढे नेत ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. वीस वर्षे नगरसेवक आणि एकदा स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले अजित गव्हाणे यांनी योग्य वेळ साधत महायुतीतून शरद पवार गटात प्रवेश केला. तिकीट मिळवत त्यांनी लांडगे यांच्याविरोधात रान पेटवले. लांडगे यांनी योग्यवेळी हिंदुत्वाचे कार्ड काढत मतदारांना साद घातली. दहा वर्षांत झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा ठेवला. आंध्रा धरणातून सुरू झालेला पाणीपुरवठा, भामा आसखेड योजनेचे काम, मोशीतील रुग्णालय, कचऱ्यातून वीजनिर्मितीचा प्रकल्प अशी कामे पुढे आणली. जगातील सर्वांत मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि संविधान भवनाची केलेली पायाभरणी मांडत मराठा आणि ओबीसी मतदारांना साथ घातली. याचा फायदा लांडगे यांना होणार असल्याची चर्चा आहे.
परिवर्तनाचा मुद्दा गव्हाणेंच्या फायद्याचा
दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्यांचे न सुटलेले प्रश्न आणि भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त मतदारसंघ हे मुद्दे महाविकास आघाडीने उचलले. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूककोंडी, ठेकेदारी प्रक्रियेतील रिंग आणि वाढलेली गुन्हेगारी प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवली. संभाजी महाराजांच्या पुतळ्यात झालेला भ्रष्टाचार आणि जमिनींचे व्यवहार अशा आरोपांनी वातावरण तापले. प्रचाराच्या शेवटी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभा घेत परिवर्तनाचे आवाहन केले. त्यामुळे भोसरीत वातावरण फिरल्याची चर्चा झाली.