इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या चुकीच्या मोजणीने सोसायटीचा ये-जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला गेल्याने बालेवाडीतील दोन सोसायट्या संकटात सापडल्या आहेत. भविष्यात या इमारती पाडल्या जाण्याचा आणि ६० कुटुंबांची ये-जा बंद होण्याचा धोका निर्माण झाला असून, या संशयास्पद कृतीविरुद्ध संबंधित भू-कर मापक कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार आणि मागणी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली आहे. बालेवाडी येथील अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार नोंदवली आहे.
खासगी मिळकतदारासाठी हे कारस्थान केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी एमराल्ड पार्कचे अध्यक्ष डॉ. विजय भिलवाडे, सेलिब्रेशन सोसायटीचे सचिव संतोष छाजेड, राजाराम ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, फ्लॅट धारक उपस्थित होते.