Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजभुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची...

भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : लोणावळा भुशी डॅम परिसरात मागील रविवारी एक मोठी हृदयद्रावक घटना घडली होती. त्या घटनेने राज्य हादरून गेले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन खळबळून जागे झाले होते आणि भुशी डॅमच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. आता भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत केली आहे.

पावसाळी सहलीसाठी लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये पुण्याच्या हडपसरमधील अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात डोळादेखत पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं होत. यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीच्या माध्यमातून निधी

पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून भुशी धरण दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भुशी धरण परिसरातील दुर्घटना दुर्दैवी असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. या निधीतून संभाव्य धोकायदायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणे, कुंपण घालणे, सुरक्षीततेसाठी जाळ्या लावणे आदी कामे करण्यात येतील. असे अजित पवार म्हणाले.

सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार

पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी माहितीफलक लावणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आदी कार्यवाही आधीपासूनच करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दुर्गम धोकादायक स्थळीही सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments