Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजभाजप पदाधिकारी सांगणार मनातील लोकसभा उमेदवार

भाजप पदाधिकारी सांगणार मनातील लोकसभा उमेदवार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात भाजपचा उमेदवार कोण असणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली असताना याची चाचपणी करण्यासाठी प्रदेश पातळीवरून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे निरीक्षक गुरुवारी (ता. २९) पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उमेदवाराबाबत चाचपणी करणार आहेत. निरीक्षकांमार्फत हा अहवाल प्रदेश भाजपकडे सुपूर्द केला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत आचारसंहिता जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वेक्षण करून त्यानुसार पक्षाची रणनीती निश्चित केलेली आहे. आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातील २३ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची यादी जाहीर केलेली आहे.

यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी आमदार आशिष शेलार आणि मदन येरावार यांची नियुक्ती केली आहे. मात्र, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने शेलार व येरावार यांना वेळ उपलब्ध होणार नसल्याने त्यांच्या ऐवजी माजी मंत्री कृपाशंकर सिंह हे पुण्यात संवाद साधण्याची शक्यता आहे.

प्रदेशाकडून पाठवलेले निरीक्षक शहरातील भाजपच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, महत्त्वाचे पदाधिकारी अशा सुमारे ७० ते ८० पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करून उमेदवाराचे संघटन कौशल्य, वैयक्तिक संपर्क, कामकाज करण्याची पद्धत, लोकसंपर्क, निवडून येण्याची क्षमता आदी माहिती योग्य उमेदवार कोण, याचा कौल घेणार आहेत. याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाईल. त्यानंतर भाजपचे उमेदवार असणाऱ्या २३ लोकसभा मतदारसंघांचा अहवाल प्रदेश भाजपतर्फे केंद्रीय निवडणूक समितीपुढे सादर केला जाणार आहे. त्यानंतर या समितीमार्फत उमेदवारांवर शिक्कामोर्तब केली जाईल.

हे आहेत इच्छुक

पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, संजय काकडे, सुनील देवधर, शिवाजी मानकर हे इच्छुक आहेत. पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांकडून या इच्छुकांबद्दल माहिती घेतल्यानंतर त्यांच्यापैकी एकाची उमेदवारी जाहीर केली जाते की अन्य कोणी अनपेक्षितपणे समोर येईल, याबाबतचा निर्णयही केंद्रीय समिती घेणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments